माध्यमिक शाळा संहिता | निधीचे अंशदान




11.1) शाळेने किंवा तिच्या व्यवस्थापनाने इमारत निधी, शालेय दिन किंवा महोत्सव निधी किंवा निरोप किंवा जन्मदिन यासारख्या प्रसंगी उभारावयाच्या अन्य कोणत्याही निधीकरिता विद्यार्थी, त्यांचे आई-वडील किंवा पालकांवर अंशदान देणे बंधनकारक करता कामा नये.


11.2) शाळा प्रवेश किंवा वर्गोन्नती देणे यासारखे कोणतेही विशेष फायदे देण्याकरिता शाळेने किंवा तिच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांकडून किंवा पालकांकडून कोणतेही अंशदान, देणगी किंवा कोणत्याही प्रकारचे रोखीच्या किंवा वस्तूच्या स्वरूपातील अधिदान स्वीकारता कामा नये.


कोणत्याही अनधिकृत संस्थेने अथवा संघटनेने शाळांमार्फत शाळेतील विद्यार्थ्यांकडून किंवा त्यांच्या पालकांकडून निधी गोळा करण्यासाठी पत्रव्यवहार केला तर त्या संस्थेची अधिकृतता तपासल्याशिवाय विद्यार्थ्यांमार्फत निधी गोळा करण्यात येऊ नये. तसेच निधी संकलनाचे कामांमध्ये विद्यार्थ्यांना विशेषतः विद्यार्थिनींना सक्रिय भाग घेण्यास भाग पाडू नये.


ज्या संस्था मान्यताप्राप्त असून प्रतिवर्षी विशिष्ट कालावधीत एखाद्या राष्ट्रीय अथवा सामाजिक स्वरूपाच्या कार्यासाठी (उदा. समाज शिक्षण, शिक्षण कल्याण निधी, रेडक्रॉस इ,) निधी गोळा करतात व त्यास पूर्वापार मान्यता चालू आहे अशा संस्था वरील बाबींसाठी अपवाद समजण्यात याव्यात.


11.3) शाळेच्या किंवा तिच्या व्यवस्थापनाला समुचित प्राधिकारी यांची पूर्व परवानगी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांकडून किंवा विद्यार्थ्यांमार्फत केवळ स्वेच्छेने कोणत्याही विशिष्ट कारणासाठी निधी गोळा करता येईल मात्र, असा निधी, देणगी किंवा कोणत्याही प्रकारचे रोखीच्या किंवा वस्तूच्या स्वरुपातील अधिदार

 (एक) वर्ष सुरू होण्याच्या तारखेच्या एक महिना आधी आणि एक महिना नंतर


( दोन) वार्षिक परीक्षेचे निकाल जाहीर करण्याच्या तारखेच्या एक महिना आधी व एक महिन्यानंतर या कालावधीत वसूल करता किंवा स्वीकारता कामा नये. शाळेने किंवा तिच्या व्यवस्थापनाने अशा वसुलीचे तपशीलवार हिशोब आणि अन्य अभिलेख ठेवले पाहिजे आणि उक्त प्राधिकाऱ्याने मागणी केली असता ते निरीक्षणाकरिता सादर केले पाहिजेत तथापि,असा निधी गोळा करताना विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण पडणार नाही किंवा त्याच्या अभ्यासाचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे.


11.4) अशा प्रकारे गोळा केलेला सर्व निधी शासन निर्णय, शिक्षण विभाग,क्रमांक जीएसी/1071/24624/ई, दिनांक -08/02/1973 अन्वये स्थापन केलेल्या शाळेच्या विकास निधी मध्ये जमा करण्यात यावा.


अनुदान प्राप्त अशासकीय माध्यमिक शाळांनी आपल्या इमारती लग्नकार्यासाठी अथवा इतर समारंभासाठी भाड्याने दिल्यास त्यापासून मिळालेल्या उत्पन्नाची रक्कम शाळेच्या देय वेतनेतर अनुदानातून कपात न करता ती शाळेच्या विकास निधी जमा करावी. खाजगी समारंभाला जागा देण्यामुळे मिळवलेल्या भाड्याची रक्कम विकास निधी जमा केली असली तरी ती संस्थेच्या वर्गणीचा भाग म्हणून समजता येणार नाही.


शाळा संहिता नियम क्रमांक 11.3 एखाद्या विविक्षित कारणासाठी शिक्षणाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीने शाळा विद्यार्थ्यांकडून त्यांच्या स्वखुशीने निधी संकलन करण्याचे काम करू शकेल. परंतु त्यांचा हिशोब अधिकाऱ्याने मागितला तर शाळेला तो द्यावा लागेल असे करताना विद्यार्थ्यांना त्रास होता कामा नये अथवा त्याच्या अभ्यासाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. असा जमविलेला सर्व निधी शालेय सहिता 11.4 प्रमाणे शाळेच्या  विकास निधीतच जमा करणे आवश्यक असते असे बंधन सर्व मान्य शाळांच्या बाबतीत शासनाने घालून दिली आहे याबाबत शासनाचा दिनांकः 07/02/1984 रोजीचा शासन निर्णय याचे अवलोकन करावे,


11.5) वरील नियम क्रमांक11.3 च्या तरतुदी विरुद्ध उभारण्यात आलेला कोणताही निधी अनधिकृत समजला जाईल आणि असा निधी उभारणारी शाळा शिस्तभंगाच्या कारवाईची पात्र ठरेल.


16.6) वर निर्दिष्ट केलेल्या 'अंशदान' या संज्ञेत व्याजी किंवा बिनव्याजी अल्पमुदतीच्या किंवा दीर्घ मुदतीच्या ठेवी व कर्जे यांचा समावेश होतो.

शासन निर्णय, शिक्षण विभाग क्रमांक जीएसी/1073/दिनांक- 17/02/1973 आणि क्रमांक जी एसी/1073/35628(तीन)ई,दिनांक: 22/05/1974

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा