पूर्व विदर्भातील शाळा, महाविद्यालये सुरू करा


 विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

 विभागीय आयुक्त वर्मा यांना निवेदन सादर



नागपूर - कोविड मुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पूर्व विदर्भातील शाळा व महाविद्यालये तातडीने सुरू करावी, अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर विभागीय आयुक्तांना आज (ता. ५) दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

विदर्भात २८ जूनपासून २०२१ - २२ हे नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. मात्र, कोविडच्या अनामिक धोक्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मागील शैक्षणिक सत्रात (२०२०-२१) कोविडच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष अध्यापनाअभावी आभासी पध्दतीने शैक्षणिक सोपस्कार पार पडले. मात्र या आॅनलाईन पध्दतीत अनेक अडचणी आल्यामुळे अनेक मुलांपर्यंत (विशेषतः ग्रामीण भाग) प्रत्यक्ष अध्यापन कार्य पोहचू शकले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून दूर राहिले.

या नवीन शैक्षणिक वर्षांत गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर व वर्धा या जिल्ह्य़ात कोविड आजाराचा जोर ओसरला आहे. अनेक गावे कोरोना मुक्त झाली आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने तसेच विद्यार्थ्यांकडे मोबाईलचा अभाव, डाटा प्राब्लेम, कनेक्टिव्हिटीची समस्या या सर्व बाबींमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका बळावला आहे. या बिकट परिस्थितीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता कोविड च्या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे पाळून पूर्व विदर्भातील शाळा, महाविद्यालये तातडीने सुरू करावी, अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ)तर्फे शिक्षक नेते व प्राचार्य श्री. मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, माध्यमिक संघटक श्री शेषराव खार्डे, महिला संघटिका अर्चना कोट्टेवार, मुख्याध्यापक धिरज यादव, सुनील कुलकर्णी, राजू हारगोडे, राजकुमार गिल्लूरकर, शाळाबाह्य शोध समितीचे सदस्य मुकुंद अडेवार, भिमराव शिंदे, मेश्राम यांनी केली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता वर्मा, शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना निवेदन सादर करुन या विषयावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

मागिल सत्रात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. २०२१- २२ या सत्रात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता कोविड मुक्त गावात शाळा सुरु व्हाव्यात, अशी माफक अपेक्षा आहे. 

मिलिंद वानखेडे, शिक्षक नेते

२ टिप्पण्या: