विदर्भातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर लवकरच शिक्षणमंत्र्यांची नागपुरात बैठक आयोजित करणार





🔵 *क्रिडामंत्री ना श्री सुनील केदार यांचे आश्वासन*

🔵 *स्काऊट गाईड अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ना श्री सुनील केदार यांचा सत्कार*


नागपूर - विदर्भातील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या विविध समस्या शासनदरबारी प्रलंबित आहे. या संदर्भात मंत्रालयात खेटा मारणे आवाक्याबाहेर आहे. या करीता येत्या महिन्याभरात शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत नागपुरात मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांची बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन क्रिडामंत्री ना श्री सुनीलबाबू केदार यांनी दिले.

                   आज (ता ८) मुख्याध्यापक व शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, विदर्भ मुख्याध्यापक संघ व विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर तर्फे ज्येष्ठ मार्गदर्शक बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ना श्री सुनीलबाबू केदार यांची शेतकरी भवन येथे भेट घेतली.

यावेळी शाळांना प्रलंबित वेतनेतर अनुदान देण्यात यावे, सन २०२१ - २२ ची संचमान्यता प्रचलित पध्दतीने करण्यात यावी, निकषपात्र अंशतः अनुदानित शाळांचा अनुदान टप्पा वाढविण्यात यावा, त्रिस्तरीय सुधारीत वेतनश्रेणी शालेय कर्मचाऱ्यांना लागू करावी, नागपूर जिल्ह्य़ातील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता तातडीने देण्यात यावा, बिडीएस प्रणाली तातडीने सुरू करण्यात यावी, वरिष्ठ व निवड श्रेणीचे लाभ तातडीने देण्यात यावे यासह इतर मागण्यांवर चर्चा करण्यात आली. सदर मागण्यांच्या पूर्ततेसाठी लवकरच नागपुरात शिक्षणमंत्री ना वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत सर्व शिक्षणाधिकारी व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येईल व शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी स्वतः वैयक्तिक प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही क्रिडामंत्री ना श्री सुनीलबाबू केदार यांनी दिली. यावेळी भारत स्काऊट गाईडच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ना श्री सुनीलबाबू केदार यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

शिष्टमंडळात ज्येष्ठ मार्गदर्शक श्री बबनराव तायवाडे, अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष श्री मारोतराव खेडेकर, शिक्षक नेते व माजी शिक्षण मंडळ सदस्य श्री मिलिंद वानखेडे, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष श्री अशोक पारधी, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव सतिश जगताप, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे नागपूर विभागीय सचिव श्री खिमेश बढिये , विदर्भ प्रतिनिधी प्रदीप गोमासे, वर्धा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष श्री रामेश्वर लांडे, श्री लक्ष्मण राठोड, श्री राम बांते, श्री हरिभाऊ खोडे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा