संघटना म्हणजे काय ?


 (विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)

    एकाच विचाराने प्रेरित होऊन,  एकाच उद्देशासाठी लढणारे लोक एकत्र येऊन जो गट तयार होतो, त्याला 'संघटना' असे म्हणतात.


   अनुकूल दिवसांत दिसणारी शंभर डोकी म्हणजे संघटना नाही, तर प्रतिकूल दिवसांत साथ देणारे काही मोजके सहकारी म्हणजे संघटना. हवेबरोबर तोंड फिरवणारी १०० वातकुक्कुट डोकी म्हणजे संघटना नव्हे; तर वादळातही ठामपणे पाय रोवून आपल्या ध्येयाशी ईमान राखणारे शिलेदार म्हणजे 'संघटना' होय.


  👉👉 सामाजिक क्षेत्रात वावरताना मानापमान, राग, लोभ, आरोप,प्रत्यारोप होणारच. वैचारिक मतभेद तर अपरिहार्यच, परंतु अनेक अडचणींना तोंड देऊन जे काही टिकून राहते; ती म्हणजे संघटना


   म्हणून संघटित होऊ संघर्ष करु, अन्यायावर मात करु!


   राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता या ग्रंथात दोन ओळींत संघटनेचे महत्व व्यापकतेने विषद केले आहे. ते म्हणतात…


 *हत्तीस आवरी गवती दोर!

मुंग्याही सर्पास करती जर्जर!!

रानकुत्रे संघटोनी हुशार!

व्याघ्र-सिंहासी फाडती!!*


  यावरुन मानवाच्या जीवनात संघटनेचे महत्त्व किती मोठे आहे, हे आपण समजू शकतो. असे म्हणतात की, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाजात (समूह) राहूनच मानवाचा सर्वांगीण विकास होत असतो. त्याच्या व्यक्तीमत्वाला विविध कंगोरे फुटून त्याचे व्यक्तिमत्त्व बहरत असते.


   जो माणूस समाजशील नसतो, तो कितीही बुद्धिवान आणि श्रीमंत असला, तरी एका विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे जाऊन समाजाला त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणूनच प्रत्येकाच्या समाज जीवनात संघटनेचे अनन्य साधारण असे महत्व आहे.


   जी व्यक्ती कोणत्या तरी संघटनेसोबत जोडलेली असते, त्या त्या व्यक्तींना लोक आपुलकीने ओळखतात. काही ठिकाणी तर इतरांपेक्षा जास्त मानसन्मान मिळतो. काही व्यक्ती संघटनेत खूपच कार्यरत असतात. त्यांना कमी कालावधीत जास्त प्रसिध्दी मिळते. संघटना जर काळानुरुप मोठी होत गेली; नावलौकीकास आली, तर आपोआपच कार्यकर्त्यांचेही नाव व्हायला लागते. त्यांना पद, प्रतिष्ठा,  प्रसिद्धी, पत मिळायला लागते. काही लोकांच्या डोक्यात मग या प्रसिद्धी व पैश्याची हवा चढायला लागते. ते स्वतःला संघटनेपेक्षा मोठे समजायला लागतात. त्यांच्यात प्रचंड अहंकार निर्माण होतो. माझ्यामुळेच ही संघटना आहे, असे त्याला वाटू लागते. मीच या संघटनेला मोठे केले, असा अहंभाव किंवा न्यूनगंड त्याच्यात निर्माण होतो. मग त्या व्यक्तीचे संघटनेतील वागणे, बोलणे, चालणे पूर्णपणे बदलून जाते.


   ज्या कार्यकर्त्यांच्या प्रेमावर आणि श्रमावर तो मोठा झालेला असतो, त्यांनाच तो तुच्छ समजायला लागतो. त्यांच्यासोबत बोलायला त्याला आता वेळ नसतो. त्यांचे फोन उचलण्यात त्याला कमीपणा वाटतो. आता त्याचा कार्यरतपणा पूर्णतः बदललेला असतो आणि इथूनच मग त्याच्या विनाशाला सुरुवात होते.


 जगातील कोणत्याही संघटनेच्या व कार्यकर्त्यांच्या बाबतीत हे असेच घडत असते.

 

 संघटनेत काही ज्ञानी वक्ते, लेखक, प्रचारक असतात. त्यांच्या माध्यमातून संघटनेची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहचवायची असतात. त्यामुळे अशी ज्ञानी मंडळी संघटनेचे जसे वैभव असतात, तसे कार्यकर्ते देखील संघटनेचा प्राण असतात, त्यामुळे ही दोन्ही मंडळीं तितकीच महत्वाची असतात.


   संघटनेत वक्ता, लेखक किंवा प्रचारक आणि कार्यकर्ता या दोहोंमध्ये उत्तम संवाद आणि समन्वय असणं खुप गरजेचे असते. काही विसंवाद निर्माण होऊ नये याची पूर्व काळजी घेणं, हेही तितकंच महत्वाचं असतं. झालाच तर विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त ताणू देवू नये याचीही काळजी घ्यायला हवी.


 संघटनेत सर्वांना तितकेच महत्व आहे, याचेही भान असलं पाहिजे. नाहीतर अहंकार उत्पन्न अशी काही मंडळी डोक्यावर चढतात आणि स्वतःला संघटनेपेक्षा मोठी समजायला लागतात. त्या व्यक्तीची महत्त्वाकांक्षा प्रचंड वाढायला लागते. तो मर्यादेच्या पलिकडेचे स्वप्न पाहतो आणि आपण या संघटनेतून बाहेर पडलो तर ही संघटनाच संपून जाईल, असा एखाद्याचा भ्रम होतो.


 संघटनेच्या विरुध्द कारवाया करायला लागतो, बोलायला लागतो, कार्यकर्त्यांच्या मनात नेतृत्वा विरुध्द खोटे, नाटे भरवलं जातं आणि संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न होतो.


  बरेचसे कार्यकर्ते हुशार, समजूतदार आणि निष्ठावंत असल्यामुळे अशा कारस्थानाला बळी पडत नाहीत. उलट अशांना संघटनेविषयीची आत्मियता मोठया अधिकार वाणीने सांगतात. एवढंच नाही तर, अशा चुकीच्या कार्यकर्त्यांच्याविषयी सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील त्याच्याबद्दल असलेली आत्मियता हळू हळू कमी होवून जाते.


  अशावेळी थोडं मागे वळून पाहिल्यावर मग काहींचे डोळे उघडतात, झाल्या चुकीची समज येते, संघटनेचे महत्व समजते. आपल्यामुळे संघटना नाही तर संघटनेमुळे आपण आहोत, याची जाणीव होते. पण या जाणिवेपर्यंत थोडी अधिकची वेळ ही निघून गेलेली असते. अशावेळी धन, दौलत, पैसा कितीही मिळाला तरी कार्यकर्त्यांचे प्रेम आणि आपुलकी मात्र त्याला परत कधीच मिळू शकत नाही.


 पण जो कार्यकर्ता संघटनेसोबत प्रामाणिक असतो. दिलेली जबाबदारी यथाशक्ती पार पाडतो, संघटना प्रमुख आणि सोबतच्या सर्व सहकाऱ्यांप्रती आदरभाव राखून असतो, त्याला त्याचे फळ एक दिवस निश्चितच मिळते. संघटनेला वाहून घेणारा या दृष्टीनेच सर्वजण त्याच्याकडे पाहतात. म्हणून संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या संघटनेसोबत एकनिष्ठ राहावे. संघटनेत रुसवे, फुगवे, नाराजी, वादविवाद चालतच असतात. पण ज्या संघटनेमुळे आपल्याला सर्वकाही मिळाले त्याच्या सोबत मात्र कधीही स्वतःहून रुसू नये. नाहीतर संघटनेच्या इतिहासात प्रत्येकाची जशी अलौकिकत्वाची नोंद होतं असते, तशी आपलीही आगळी वेगळी नोंद होत असते, हे ध्यानात ठेवावे.

    कोणत्याही संघटनेचा कार्यकर्ता स्वतःला निष्ठावंत कार्यकर्ता समजत असेल, तर त्यांनी पुढील गोष्टींचे अवलोकन करुन स्वतःमध्ये त्या आत्मसात कराव्यात.


💧१) संघटनेची तत्वप्रणाली त्याला मान्य असावी. संघटनेचे अंतीम ध्येय, उद्दिष्टे त्याला माहित असावीत.


💧२) समाजाबद्दल आपुलकी असावी. संघटनेच्या कार्यकर्त्यांबद्दल त्याच्या मनात सदभावना, प्रेम, आदरभाव असावा.


💧 ३)स्वत:च्या समाजाचा पूर्वइतिहास त्याला माहीत असावा. कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, असे म्हटले जाते.


💧४) कार्यकर्ता हलक्या कानाचा नसावा. संघटनेचा नेता आणि उद्दिष्ट यावर त्याचा ठाम विश्वास असायला हवा.


💧५) कार्यकर्त्याच्या ठायी अहंभाव नसावा. दुसऱ्या कार्यकर्त्याचा वत्याच्या कामाचा सन्मान, आदर करणारा असावा.


💧६) पदलोभी नसावा–पदाची लालसा असलेले कार्यकर्ते शत्रुंपेक्षाही घातक असतात. ते स्वतःही संघटन वाढवीत नाहीत आणि इतरांनाही वाढवू देत नाहीत. मग संघटन फक्त लेटरपॅडवर शिल्लक राहते.


 💧७) आकलनशक्ती–नेत्याच्या सूचक शब्दांचा अर्थ समजला पाहिजे. उच्च दर्जाची आकलन क्षमता असावी.


💧८) सूक्ष्म निरीक्षण–कार्यकर्त्याकडे सूक्ष्म निरीक्षणशक्ति असावी. सर्वच समाजात घडणाऱ्या लहानमोठ्या घटनांची त्याने नोंद घ्यायला हवी.


💧९) भाषण व संभाषण चातुर्य –आपल्या मधुर वाणीने मुद्दा पटवून देण्याचे चातुर्य कार्यकर्त्याने अवगत करावे.


💧१०) आत्मविश्वास–निराश मनोवृत्ती नको. अपयशाचे यशात रूपांतर करतो, तोच खरा लढवय्या, नाहीतर रडवय्या.


 💧11) परिश्रम, चिकाटी आणि सातत्य – ध्येय गाठण्यासाठी इतरांपेक्षा जास्त परिश्रम करण्याची तयारी हवी   प्रयत्नात सातत्य हवे, धरसोड नको.


💧१२) कार्यकर्ते जोडणारा–कार्यकर्ते जोडणारा असावा. तोडणारा नको.प्रभावी संघटन हीच संघटनेची शक्ति असते.


💧१३) कार्यकर्ते हेरणारा व व्यक्तीपरीक्षक – कर्तृत्वशाली, सदाचारी आणि प्रभावी व्यक्तींना हेरून त्यांनासंघटनेत सामील करण्याचे कौशल्य कार्यकर्त्याकडे हवे.चांगले काम करणारा कार्यकर्ता पुढे जात असेल, तर त्यावर खोटे आरोप करुन, त्याला बाजूला करण्याच प्रयत्न कदापिही करु नका.


💧१४) शिस्त व वेळ पाळणारा पाहिजे.


💧१५) त्याला उपलब्ध साधनांचा काटकसरीने व कौशल्याने वापर करता यावा.


💧१६) श्रेय लाटण्याच्या मनोवृत्तीचा नसावा. धोकेबाज नसावा.


💧१७) कार्यक्रमाचे आयोजन करता यावे. संघटनेचे विविध उपक्रम राबविण्याची जबाबदारी स्विकारावी. पुढाकार घ्यावा किमान संघटनेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्याचा सक्रीय   सहभाग असावा.


💧१८) समताप्रेमी व समर्पित मनोवृत्तीचा असावा. श्रमाची लाज वाटू नये.


💧१९) अभ्यासू,चिकित्सक व संशोधक वृत्तीचा असावा.


💧२०) गुप्तता – संघटनेतील काही गुप्त गोष्टी गुप्तच ठेवणारा असावा.


💧२१) कार्यकर्त्याला संघटनेचा व स्वतःचा विचार दुस-यांस पटवून देता यायला हवा.


💧२२) प्रसिद्धी व प्रतिष्ठा यांस हपापलेला नसावा.


💧२३) अंधश्रद्धाळू नसावा.


💧२४) संघटनेसाठी वेळ, बुद्धी, श्रम, कौशल्य आणि पैसा हे पंचदान देणारा असावा.


💧२५) संघटना समाजातील सर्वांच्या भल्यासाठी आहे. स्वत:च्य भल्यासाठी नाही. त्यामुळे संघटनेसाठी सातत्याने पंचगुणांचे   योगदान करणारा असावा.


   म्हणून सांगावेसे वाटते की, ज्या संघटनेकडे वरील गुणधर्म असलेले कार्यकर्ते असतात, त्या संघटनेला जगात तोड नसते. आपल्यालाही आपलं संघटन मजबूत बनवायचं असेल, तर वरील गुणधर्म असलेले कार्यकर्ते संघटनेत असणे अत्यावश्यक आहे.          

              ✍....

(विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा