*कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करा*
🟣 धर्मराज शैक्षणिक संस्थेची आग्रही मागणी
🟣 विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्या
कन्हान - विद्यार्थ्यांना शालेय जीवनात विविध शिष्यवृत्तीसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रे तयार करावे लागतात. यासाठी कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करावे, अशी मागणी धर्मराज शैक्षणिक संस्थेतर्फे श्री भिमराव शिंदेमेश्राम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार पारशिवनी यांच्याकडे केली आहे.
नुकतेच शैक्षणिक सत्र २०२२ - २०२३ ला सुरुवात झाली आहे. अनुसूचित जाती व जमाती, भटक्या विमुक्त जाती व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती (अज), डॉ बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती (भटक्या विमुक्त व ओबीसी), अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती (सर्व जाती), कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती या सारख्या विविध शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सप्टेंबर महिन्यापर्यंत शाळेत सादर करावे लागते. यासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, पालकांच्या उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखले याची आवश्यकता असते. ही वेळखाऊ प्रक्रिया असल्याने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सादर करु शकत नाही. त्यामुळे हक्काच्या लाभापासून शालेय विद्यार्थी वंचित राहतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्रातील आर्थिक लाभाचे नुकसान होऊ नये यासाठी कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी धर्मराज शैक्षणिक संस्थेतर्फे श्री भिमराव शिंदेमेश्राम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पारशिवनी तहसीलदार श्री सांगळे यांच्याकडे केली. यावेळी शिष्टमंडळात धर्मराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पत्रकार श्री धनंजय कापसीकर, कांद्री ग्रामपंचायत सदस्य श्री चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे ग्रामीण जिल्हा संघटक श्री संघटक गणेश खोब्रागडे, मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी श्री जितेंद्र भांडेकर यांचा समावेश होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा