*3 जानेवारी दिनविशेष 2023 !*
🛟 *मंगळवार* 🛟
💥 *बालिका दिन*
💥 *महिला मुक्तीदिन*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1952 - स्वतंञ भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणूका*
👉 *2004 - नायगाव (ता.खंडाळा जि.सातारा)येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषीत करून राष्ट्राला अर्पण करण्यात आले*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1831 - साविञीबाई फुले आधुनिक भारतातील प्रथम शिक्षिका ,समाजसुधारक आणि महात्मा फुले यांची पत्नी यांचा जन्म*
👉 *1931 - यशवंत दिनकर फडके- मराठी लेखक व इतिहाससंशोधक यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2002 - सतिश धवन- भारतीय अंतराळशास्ञज्ञ यांचे निधन*
👉 *2015 - व्हायोलिनवादक एम.एस.गोपालकृष्णन यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
चंद्रपूर 9403183828
➿➿➿➿➿➿➿➿➿ 📚✍📕🇮🇳🧕🇮🇳📕✍📚
*आद्यशिक्षिका*
*ज्ञानज्योती, क्रांतिज्योती*
*ज्ञानाई*
*सावित्रीबाई ज्योतीराव फुले*
*जन्म : ३ जानेवारी १८३१*
(नायगाव, सातारा, महाराष्ट्र)
*मृत्यू : १० मार्च १८९७*
(पुणे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र)
चळवळ : मुलींची पहिली शाळा
सुरु करणे
संघटना : सत्यशोधक समाज
पुरस्कार : क्रांतीज्योती
प्रमुख स्मारके : जन्मभूमी नायगाव
धर्म : हिंदू
वडील : खंडोजी नेवसे(पाटील)
आई : सत्यवती नेवसे
पती : जोतीराव फुले
अपत्ये : यशवंत फुले
सावित्रीबाई जोतीराव फुले ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराने झाला.
💁♀ *चरित्र*
सावित्रीबाईंच्या आईचे नाव सत्यवती तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना "फुले" हे आडनाव मिळाले.
सावित्रीबाईंचे पती जोतीराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. गुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी "भिडेवाड्यात" जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.
(यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा २०१६ सालीही चालू आहे. (मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे १८४७ मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी १८४९ मध्ये मुले आणि मुलींसाठी पहिली सहशिक्षण शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.)
सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले.
🎖 *सत्कार*
पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत. *सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासुन ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.*
🌐 *गूगल डूडल*
३ जानेवारी, २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमीत्त त्यांचे गूगल डूडल प्रसिद्ध करुन गूगलने त्यांना अभिवादन केले.
📺 *दूरदर्शन मालिका*
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर दूरदर्शनच्या ’किसान’ वाहिनीवर २८ सप्टेंबर २०१५ पासून सोमवार ते शुक्रवार या काळात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील का हिंदी मालिदाखविली जात आहे.
📙 *सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके*
काव्यफुले (काव्यसंग्रह)
सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
सुबोध रत्नाकर
बाव नकशी
📚 *सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित साहित्य, कार्यक्रम वगैरे*
Savitribai - Journey of a Trailblazer (Publisher : Azim Premji University)
'हाँ मैं सावित्रीबाई फुले' (हिंदी), (प्रकाशक : अझीम प्रेमजी विद्यापीठ)
सावित्रीबाई फुले (लेखक : अभय सदावर्ते)
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका उषा पोळ-खंदारे)
Savitribai Phule (इंग्रजी, N. K. Ghorpde)
कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले (लेखिका डाॅ. किरण नागतोडे)
सावित्रीबाईचा संघर्ष (के.डी. खुर्द)
थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले (केतन भानारकर)
पुण्यश्लोक सावित्रीबाई फुले (गौरी पाटील)
युगस्त्री सावित्रीबाई फुले (विठ्ठल लांजेवार)
सावित्रीबाई फुले (लेखक : जी.ए. उगले)
सावित्रीबाई फुले (लेखक : डी.बी. पाटील )
जोतिकांता सावित्री (दा.स. गजघाटे)
सावित्रीबाई फुले (प्रा. झुंबरलाल कांबळे)
Shayera.Savitri Bai Phule (in urdu) Author Dr. Nasreen Ramzan Sayyed
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : ना.ग. पवार)
सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (लेखक : ना.ग. पवार)
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : नागेश सुरवसे)
स्त्री महात्मा सावित्रीबाई फुले (नाना ढाकुलकर)
मी जोतीबांची सावित्री (नारायण अतिवाडकर)
सावित्रीबाई फुले (लेखिका : निशा डंके)
सावित्रीबाई फुले (लेखिका : प्रतिमा इंगोले )
सावित्रीबाई फुले (प्रमिला मोडक)
थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले (प्रेमा गोरे)
साध्वी सावित्रीबाई फुले (लेखिका : फुलवंता झोडगे). - चिनार प्रकाशन
सावित्रीबाई फुले चरित्र (बा.गं. पवार)
तेजाचा वारसा सावित्रीबाई फुले (लेखिका : प्रा. मंगला गोखले)
क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले (डाॅ. मा.गो. माळी) - मॅजेस्टिक प्रकाशन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (डाॅ. मा.गो. माळी) - स्नेहवर्धन प्रकाशन
सावित्रीबाई फुले - श्रद्धा (लेखक : मोहम्मद शाकीर)
सावित्रीबाई फुले (लीला शाह)
ज्ञान ज्योती माई सावित्री फुले (लेखिका : विजया इंगोले)
त्या होत्या म्हणून (लेखिका : डॉ. विजया वाड)
Savitribai Phule (इंग्रजी, विठ्ठलराय भट)
युगस्त्री : सावित्रीबाई फुले (विठ्ठल लांजेवार)
सावित्रीबाई जोतिबा फुले : जीवनकार्य (शांता रानडे)
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका : शैलजा मोलक)
साध्वी सावित्रीबाई फुले (सविता कुलकर्णी) - भारतीय विचार साधना प्रकाशन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (सौ. सुधा पेठे)
'व्हय मी सावित्रीबाई फुले' (नाटक) (एकपात्री प्रयोगकर्ती आद्य अभिनेत्री : सुषमा देशपांडे) (अन्य सादरकर्त्या - डॉ. वैशाली झगडे)
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (विद्याविकास) (लेखक : ज्ञानेश्वर धानोरकर)
🏵 *सावित्रीबाई संमेलन/अभ्यासकेंद्र/पुरस्कार*
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन भरते. याशिवाय, द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन या नावाचे पहिले राज्यस्तरीय संमेलनही नागपूर येथे २-३ जानेवारी २०१२ या तारखांना भरले होते.
*पुणे विद्यापीठाच्या नावाचा विस्तार करून ते ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे करण्यात आले आहे.*
*पुणे विद्यापीठात ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र' या नावाचे एक अभ्यासकेंद्र आहे.*
🏆 *सावित्रीबाई फुले यांच्या नावाने काही संस्थांनी पुरस्कार ठेवले आहेत. ते असे :-*
▪कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार.
▪पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सामाजिक कार्यासाठीचा 'सावित्रीबाई फुले पुरस्कार'. हा पुरस्कार २०११-१२ सालापासून दरवर्षी, महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या एका समाजसेविकेस दिला जातो. ५००१ रुपये रोख, व सन्मानपत्र, शाल व श्रिफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
▪महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
▪चिंचवडगाव येथील महात्मा फुले मंडळाचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार
▪महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी (पुणे) तर्फे सावित्रीबाई तेजस कला राष्ट्रीय पुरस्कार
▪क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले 'आदर्श माता' पुरस्कार
▪क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
▪मध्य प्रदेश सरकारचा उत्तम शिक्षिकेसाठीचा एक लाख रुपयांचा वार्षिक सावित्रीबाई पुरस्कार (२०१२ सालापासून)
▪सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना दिले जाणारे स्त्रीरत्न पुरस्कार : आदर्श माता रत्न, उद्योग रत्न, कला रत्न, क्रीडा रत्न, जिद्द रत्न, पत्रकारिता रत्न, प्रशासकीय रत्न, वीरपत्नी रत्न, शिक्षण रत्न
▪मराठी पत्रकार परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
▪महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा सर्वोत्कृष्ट नर्सला देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार
▪महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवडचे शाखेतर्फे सामाजिक / शैक्षणिक कामासाठीचा सावित्रीबाई पुरस्कार
▪माझी मैत्रीण ट्रस्टतर्फे देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार : २११६ साली हा पुरस्कार सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी यांना देण्यात आला.
▪युनाइटेड ओबीसी फोरमचा सावित्रीवाई फुले वैचारिक वाङ्मय पुरस्कार.
▪वसईच्या लोकमत सखी मंच आणि प्रगत सामाजिक शिक्षण संस्था यांच्यातर्फे देण्यात येत असलेला सावित्रीबाई फुले पुरस्कार
▪सावित्रीवाई फुले यांच्या नावाची दत्तक-पालक योजना आहे.
🇮🇳 *जयहिंद*🇮🇳
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा