*शाळेचे खाजगीकरण म्हणजे देशाचे विनाश अटळ!*
नागपूर - शक्तीपेक्षा युक्ती नेहमीच श्रेष्ठ मानली जाते. हत्ती मानवापेक्षा कितीही ताकदवान असला, घोडा किती चपळ व मजबूत असला आणि बैल भली मोठी बैलगाडी ओढत असला तरी यांच्या ताकदीपुढे मानवाची युक्ती श्रेष्ठ असल्यामुळे त्यांना आपल्या ताब्यात ठेवण्याची (गुलाम बनविण्याची) किमया मानवाने साध्य केली आहे. *एखाद्या देशाला युध्द करुन पराजित करण्यापेक्षा डोके वापरून तेथील जनतेला फुकटच्या अन्नधान्याची सवय लावून आणि शिक्षणापासून वंचित ठेवल्यास त्या देशाला गुलामगिरीकडे नेता येऊ शकते.* सध्या भारताची आणि महाराष्ट्राची वाटचाल गुलामगिरीच्या दिशेने सुरु झाली आहे. सध्याचे सरकार हे जनतेचे सरकार नसून व्यापाऱ्यांचे सरकार आहे. *एकीकडे मराठा, धनगर आणि ओबीसींना आरक्षणाचे गाजर दाखवायचे आणि दुसरीकडे सरकारी नोकरी बंद करुन खाजगी ठेकेदारांकडून नोकर भरती करायची. तसेच UPSC विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरुन सचिव पदांच्या खाजगी भरती करायच्या.* त्याचबरोबर सर्व सरकारी शाळांचे खाजगीकरण करुन सरकार शिक्षण हक्क कायद्याला फाट्यावर मारुन मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्यापासून पळ काढत आहे. हि अतिशय धक्कादायक बाब असून देशाची वाटचाल गुलामगिरीच्या दिशेने सुरु झाली आहे.
विद्यार्थी आणि तरुण हे देशाचे भविष्य मानले जाते. म्हणून भारतीय राज्यघटनेच्या कलम ४५ नुसार १४ वर्षाखालील प्रत्येक मुला/मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे हे केंद्र आणि राज्य सरकारला बंधनकारक आहे. *"शिक्षण हक्क कायदा २००९"* नुसार शिक्षण मिळणे हा बालकांचा मूलभूत अधिकार आहे. स्वतःला विश्वगुरु म्हणणाऱ्याच्या देशात ८० टक्के जनता ही गरीब आहे. या गरीब जनतेची मुले सरकारी शाळेत शिक्षण घेत आहेत. *शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, हे दुध जो प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. असे विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.* शिक्षणाचे महत्व जाणून महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी ब्राम्हण समाजाचा त्रास सहन करुन त्यावेळी मुला/मुलींना शिक्षण दिले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनीही शिक्षणाला महत्व दिले होते. त्यांनी तर "रयत शिक्षण संस्थेची" स्थापना केली होती. "कमवा आणि शिका" या तत्वज्ञानाची सुरुवात करुन त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. छत्रपती शाहु महाराज यांनीही शिक्षणाला महत्व दिले. *शिक्षण ही जीवन जगण्याची गुरूकिल्ली आहे. जीवन म्हणजे काय? जीवन का आणि कसे जगावे? जीवनाची सार्थकता कशात आहे? जीवन पूर्ण कसे करावे? आपण जीवनातून काय घ्यावे आणि इतरांना काय द्यावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजेच "शिक्षण" होय.* शिक्षणामुळे माणूस हुशार होत असून गुलामगिरीच्या बेड्या तो झूगारू शकतो. म्हणून पूर्वीच्या काळी ब्राम्हण व्यतिरिक्त कोणत्याही बहुजन मुलांना शिक्षण घेण्यास बंदी होती. *(बहुजन म्हणजे शुद्र नसून बारा बलुतेदार, अठरा पगड जाती तसेच ब्राम्हण सोडून सर्व जाती म्हणजेच बहुजन होय. हल्लीच्या लोकांना बहुजन या शब्दाचा अर्थ कळत नाही.)* मात्र, हल्लीची बहुजनांची मुले शिक्षण घेऊन पुढे जात असल्यामुळे नोकरी आणि शिक्षणात खाजगीकरण करुन बहुजनांच्या मुळावरच घाव घातला जात आहे.
सरकारने नुकतेच सरकारी जिल्हापरिषद ६२ हजार शाळांचे खाजगीकरण करण्याचा जी.आर. काढला आहे. व्यापाऱ्यांनी ठराविक पैसे देऊन शाळेला आपले नाव देणे. ती शाळा चालविणेची जबाबदारी घेणे. त्यांच्या पैशातून शाळांची सुधारणा करुन दर्जेदार शिक्षण देणे ही सरकारची योजना आहे. *परंतु, ही योजना वरवर जरी चांगली दिसत असली तरी गरीब मुलांना शिक्षणापासुन वंचित ठेवण्याचे खतरनाक षडयंत्र आहे.* सुरवातीला Jio ने फ्री सिमकार्ड वाटले आणि त्यानंतर कसे रिचार्ज वाढवित गेले हे आपण पाहतच आहोत. त्यानुसारच सुरवातीला चांगले शिक्षण द्यायचे आणि मग नंतर परवडत नाही असे बोलून त्याच सरकारी शाळेचे खाजगी शाळेत रूपांतर करुन मोठ्ठाली फी उकळायची. *आणि मग गरिबांकडे पैसे नाही म्हणून त्यांनी शाळेत येणे बंद केल्यावर तीच अशिक्षित मुले गुन्हेगारीकडे वळतील किंवा गुलामगिरी पत्करतील. त्यानंतर पुढे गुलामांच्या पिढ्या जन्माला येतील.*
*देशाला खरच विश्वातील महान देश बनवायचे असेल तर प्रथम मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाबरोबरच आरोग्य सुविधाही मोफत पुरवायला हव्यात. अन्नधान्य, विज आणि इतर काहीही मोफत देण्यापेक्षा शिक्षण आणि आरोग्य मोफत दिल्यास देशातील प्रत्येक व्यक्ती सक्षम होईल. त्याला फुकटच्या गोष्टींची गरजच भासणार नाही. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात बुध्दीजीव जमात तयार होईल. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगात फक्त भारताचाच डंका वाजेल. भारताचा रूपया जगावर राज्य करेल. पाकिस्तान, चीन तर सोडाच जगातील एकही देश वाकड्या नजरेने भारताकडे बघण्याची हिंम्मत करणार नाही. नुसती स्वतःच विश्वगुरु असल्याची छाती ठोकून काहीच फायदा नाही. यासाठी जगाने तुम्हाला विश्वगुरु मानले पाहिजे.*
सध्या देशात आणि महाराष्ट्रात जे चालले आहे ते वाईट आहे. यावर आवाज उठविणे अत्यंत गरजेचे आहे. शाळांचे खाजगीकरण करतानाच शिक्षकांनाही देशोधडीला लावण्याचे षडयंत्र आहे. इतर खाजगी शाळा लाखोंची फी घेऊन दर्जेदार शिक्षण देतात.
*मात्र, सरकारी शाळेचे खाजगीकरण केल्यानंतर कमी वेतनात शिक्षकांची नेमणूक केली जाईल. मग तो आर्थिक विवंचनेत असलेला शिक्षक काय खाक विद्यार्थ्यांना शिकविणार?*
म्हणून प्रथम शिक्षकांनी संघटित होऊन रस्त्यावर उतरले पाहिजे. रस्त्यावर उतरतांना समाजातील प्रत्येक घटकांना याचे गांभीर्य निदर्शनास आणुन त्यांनाही आंदोलनात सहभागी करुन घ्यावे. तरच सरकार नमेल. अन्यथा गुलामगिरी पत्करून गुलामांच्या पिढ्या तयार होतील हे लक्षात घ्यावे!
मिलिंद वानखेडे
विदर्भ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर
9860214288
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा